
त्यांना अत्यंत अलौकिक असा पिता लाभला। जिजाबाईंचे मातृतुल्य प्रेम लाभले। रामायण, महाभारत, शास्त्रे, पुराणे, संस्कृत, संगीत, धनुर्विद्या य विषयांचा त्यांनी सखोल अभ्यास केला. ते राजपुत्र असुन स्वभावत: च अत्यंत शुर असल्यामुळे त्यांना बालपणापासुन युद्धकलेचे शिक्षण मिळाले.
शिवरायांचा राज्याभिषेक होईपर्यंत शंभुराजांचे आयुष्य अत्यंत सुरळीत होते. त्यांना युवराजपद मिळाल्यापासून भोसले घराण्यात गृहकलह सुरु झाला आणि शंभुराजांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली; त्यांच्या जीवनात जो झंझावात सुरु झाला त्याचा शेवट, त्यांच्या दुदैवी अंतानेच झाला.
जीवनात यशस्वी होण्यासाठी कर्तुत्वाबरोबरच भाग्याचीही जोड लागते. शिवरायांच्या अंगी जसे अलौकिक कर्तुत्व आणि दूरदृष्टी होती, तसेच दैवही त्यांचा सतत त्यांच्या सोबत असे. त्यांनी अफज़लखानाची घेतलेली भेट तसेच आग्रा येथिल जीवावरचे संकट यांच्या अभ्यास केल्यावर एक गोष्ट फार प्रकर्षाने जाणवते; ती म्हणजे, शिवरायांना जर दैवाची साथ नसती तर?? महाराजांचे शौर्य, धैर्य, दूरदृष्टी, योजकता, कल्पकता अचाट होती पण त्यांच्या जोडीला दैवानेही हात दिला नसता तर या प्रसंगात काय झाले असते याची कल्पनाही करवत नाही.
शंभुराजांचे जीवन याच्या अगदी उलट होते. ते शुर, धैर्यवान, धाडसी, साहसी, योजक, निपुण होते, पण त्यांचे एकुण आयुष्य पाहता असे वाटते की नियती त्यांच्या कपाळावर यशाचा कस्तुरी कुंकुमतिलक लावयला विसरली होती की काय?
युवराज्याभिषेक झालानंतर सैन्याच्या तुकडीवर नियंत्रण ठेवण्याचे प्रशिक्षण मिळावे म्हणुन शिवरायांनी शंभुराजांच्या हाताखाली ५ ते १० हजार सैन्य देऊन रामनगर, जव्हार ई. राज्यांवर चढाई करण्यास पाठवले होते. त्याचबरोबर दिवाणी कामकाजामध्येही शंभुराजे सहभाग घेत असत. युवराज्याभिषेकानंतर शिवरायांच्या अनुपस्थितित त्यांनी स्वत:च्या सहीशिक्याने त्यांनी अनेक निवाडे केले आहेत, तंटे सोडविले आहेत.
महाराजांचा राज्याभिषेक होईपर्यंत गादीच्या वारसाहक्काचा प्रश्न उपस्थितच झाला नव्हता, त्यामागचे महत्वाचे कारण म्हणजे जिजाबाईसाहेब, पण राज्याभिषेकानंतर फक्त १३ दिवसांनी सर्वांवर आपल्या अस्तित्वाने, व्यक्तिमत्वाने, अधिकाराने वचक ठेवणारी राजमाता १७ जुन १६७४ रोजी निधन पावली. त्यानंतरच वारसाहक्काच्या प्रश्न ऐरणीवर आला, आणि त्याला कारण म्हणजे सोयराबाईंना पट्टराणीचा मान मिळाला असला तरी युवराजपद मात्र राजारामाकडे न जाता संभाजीराजांकडे आले; त्याचबरोबर त्यांचा वारसाहक्क मान्य झाला. त्यांची राजमाता बनण्याची स्वप्ने जरी खरी होणार असली तरी गादीवर येणारा राजा हा त्यांचा पुत्र नसणार होता हे एकच कारण सोयराबाईना शंभुराजांचा द्वेष करायला पुरेसे होते.
या प्रसंगानंतर खचितच सोयराबाईंसारखी स्त्री शांत बसली असेल तरच नवल, आपल्या पुत्राला युवराज्याभिषेक करा असाही हट्ट त्यांनी शिवरायांजवळ केला असल्याची तसेच संभाजीराजांबद्दल मुद्दाम उलटसुलट गोष्टी पसरण्यास सुरुवात केली असल्याची दाट शक्यता वाटते. त्या सततच संभाजीराजांना पाण्यात बघत असाव्यात. संभाजीराजांचा उत्कर्ष, तसेच जनतेचे त्यांच्यावर असलेले प्रेमसुद्धा त्यांना खटकत असावे, आणि म्हणुनच राज्याभिषेकानंतर शिवरायांनी जेव्हा कर्नाटक स्वारी आखली, संभाजीराजांना स्वत:बरोबर न्यायचे ठरविले तेंव्हा सोयराबाईंनी त्यात मोडता घातला असावा. राणिसाहेबांच्या सल्ल्यानुसार शिवरायांनी आपला बेत रहीत केला व शंभुराजांना रायगडीच ठेवायचे ठरवल्यावर त्याही निर्णयाला राणीसाहेबांनी विरोध केला.
आणि इथेच शंभुराजांच्या दुर्देवाला सुरुवात झाली। शिवरायांबरोबर स्वारीला जायचे या विचाराने ते खुप आनंदी झाले, त्याहीपेक्षा जास्त म्हणजे आपल्या वडिलांनी पुन्हा एकदा आपल्यावर विश्वास दाखवला हा विचार शंभुराजांच्या मनावर मोरपिस फिरवुन गेला. पण त्यांचे नशिबाचे फासे उलटेच पडले, राजांबरोबर स्वारीवर जाण्याची तयारी करण्याऐवजी त्यांना कबिल्यासह रायगड सोडण्याची तयारी करावी लागली. स्वत: शिवराय त्यांना शृंगारपुरापर्यंत पोहोचवुन कर्नाटक स्वारीवर निघुन गेले. शिवरायांनी आपल्या छाव्याला अनावधानानी का होईना, पण निष्कारण शिक्षा दिली. वडिलांबरोबर स्वारीवर जायची आज्ञा मिळाल्यामुळे अत्यानंद झालेल्या त्या राजपुत्राच्या अंत:करणात राजांच्या ह्या अकल्पित निर्णयामुळे काय आणि किती खळबळ माजली असेल ? कैक वर्षे शिवरायांबरोबर आग्रास औरंगजेबाच्या दरबारापासून ते फॊंद्याच्या लढाईपर्यंत जळीस्थळी सावलीसारखे असणारे युवराज आज कोणाच्या महत्वाकांक्षेमुळे समुळ उपटले गेले? युवराज असुन एका सामान्य सुभेदाराचे जीवन त्यांच्या नशिबी का टाकले शिवरायांनी?
शृंगारपुर म्हणजे संभाजीराजांची सासुरवाडी, येसुबाईंचे माहेर. निसर्गदत्त सौंदर्य लाभलेलं छोटंसं खेडेगाव. कविमनाचा ह्या राजपुत्राला ही जागा आवडली. तिथला धोधो पडणारा पाऊस, इतका मुजोर / बळजोर असायचा की चार हातांवरचा मनुष्यसुध्हा दिसायचा नाही. सभोवतालचे गर्द रान, झाडे वगैरे सारा परिसर झोडपुन सर निघुन जायची. धुक्याच्या पडद्यातुन दिसणारा प्रचितगडाचा कडा, तिथुन प्रचंड वेगाने उड्या घेत वहाणारी शास्त्री नदी, प्रचंड धबधबे, पाण्याचा खळखळाट. निसर्ग आपले दोन्ही हात उभारुन सृष्टिसौंदर्य लुटायचा. तिथे शंभुराजांचे मन काव्यलेखनात आणि निसर्गसौंदर्यात रमत असले, तरी त्यांचे चित्त कर्नाटकात गुंतलेले असायचे; राजांच्या आठवणींनी त्यांचे मन बेचैन बेचैन व्हायचे. शंभुराजे शृंगारपुरी आल्याची वार्ता सर्व प्रभावली प्रांतात हां हां म्हणता पसरली. त्याच्याभोवती अनेक युवक जमा होऊ लागले. यांच धाडसी मुलांना एकत्र करुन त्यांनी स्वत:ची अशी ५००० फौज तयार केली, काही उत्तम, अरबी घोडी विकत घेऊन, त्यांच्या सैन्याला सराव द्यायला सुरुवात केली, त्यांची “शृंगारपुरी अश्वदौलत” आकार घेऊ लागली.
आणि त्यांच्या अपेक्षेप्रमाणेच रायगडावरुन खलिता आला आणि त्यांच्यावर शिवाजीराजे परमुलुखात असताना गडावरुन परवानगी न मागता, स्वेच्छेने नविन फौज उभी करण्यास प्रतिबंध घातला गेला. जे जे संभाजीराजे नविन करत असत, त्यावर काहीही कारण नसताना रायगडावरुन हस्तक्षेप केला जात असे. ज्याच्या जवळ आपलं मन मोकळं करावं, ज्याच्या मिठीत शिरुन मनसोक्त रडावं असं किंवा ज्याच्या केवळ पदस्पर्शाने अंगावर रोमांच उभे रहावेत, असे त्यांचे आबासाहेब तर त्यांना टाकुन, एकटेच कर्नाटकात निघुन गेले होते.
आणि अचानक संभाजीराजे ज्याची आतुरतेने वाट पहात होते, ती कर्नाटक विजयाची आणि त्याच बरोबर शिवाजीराजे राज्यात परत येत असल्याची खबर मिळली. ही खबर ऐकुन मोहरुन गेले संभाजीराजे, शिवराय येणार, त्यांचे आबासाहेब त्यांना भेटणार. शंभुराजांनी आपली माणसे शिवरायांना सन्मानाने आणण्यासाठी पुढे धाडली, अख्खे शृंगारपुर गुढ्या, तोरणे लावुन शिवरायांची वाट पहात होते, आनंदाने बेहोश शंभुराजेतर शृंगारपुराच्या वेशीवर उभे राहुन शिवरायांची वाट पहात होते. आत्ता येतिल, कुठ पर्यत आले, ….. ….. …. …. शिवराय आलेच नाहीत. म्हणजे काय? छत्रपति शिवाजीराजे आपल्या युवराजांना विसरले? शिवाजी महाराज आपल्या थोरल्या लेकाला न भेटताच रायगडी गेले, प्राण आपल्या श्वासाला न भेटताच गेला, हे कसे काय विपरीत घडले, की हे असेच घडावे म्हणुन रायगडी खलबते केली जात होती? शिवाजीराजे कर्नाटकातून परतण्यापुर्वीच शंभुराजांना होईल तितके बदनाम करण्याच्या पद्धतशीर कारवाया केल्या जात होत्या.
अखेर शंभुराजांना संपुर्ण एकटे पाडण्यात रायगडीचे शहाणे यशस्वी झाले। आई बालपणीच सोडुन गेली होती, वयोमर्यादेमुळे आजीही आणि आता गृहकलहामुळे वडिलांनीही त्यांच्या शंभुबाळाला मनापासुन दुर केले. हे असं काहीतरी होईल अशी जरा पण अपेक्षा नव्हती संभाजीराजांना, ते तर वेड्यासारखी शिवरायांची वाट पहात होते, ते येतिल, शंभुराजांनी त्यांच्या अनुपस्थितीमध्ये उभे केलेले घोडदळ पहातील, त्यांच्या पाठीवरून हात फिरवतील, त्यांचे कौतुक करतील, आणि स्वत:बरोबर पुन्हा रायगडी घेऊन जातील, मासाहेबांच्या पाचाडच्या वाड्यात जिजाऊंच्या महाली नेऊन त्यांना त्यांच्या शंभुबाळानी उत्तमरित्या राखलेले राज्य, स्वकर्तुत्वाने राखलेल्या फौजेबद्दल कौतुक करतील, आणि आणि ….. ….. ….. ….. ….. …… नाही, पण असं काहीच झालं नाही. आता मात्र असह्य असह्य कोंडी झाली शंभुराजांची. काय झालं, काय चुकले हे सांगण्यासाठी, निदान शिक्षा देण्यासाठी तरी का होईना, पण शिवराय बोलवतील, नक्कीच बोलवतील.
त्यांना बोलावणे आले, पण शिवरायांचे नाही तर दिलेरखानाचे, एकदाच नाही तर पाच – सहा वेळेला. शिवाजीराजे कर्नाटकात गेल्यानंतर दिलेरखानाकडुन मैत्रीचा हात (??) पुढे केला गेला, महाराज कर्नाटकात असताना त्यांच्या कानावर ह्या बातम्या गेल्या असल्याच पाहीजेत, तसं नसतं तर महाराष्ट्रात परत येत असताना, शिवरायांनी आपली वाट बदलली नसती, म्हणजे ते स्वारीवर असतानाही रायगडावरुन इत्थ्यंबुत बातम्या त्यांच्यापर्यंत पोहोचतील अशी व्यवस्था केलेली असावी असे दिसते.
शिवाजीराजे परत येईपर्यंत दिलेरखानाच्या कुठल्याही खलित्यास शंभुराजांकडुन होकार गेलेला नाही, पण प्रत्यक्ष वडिलांनीच पाठ फिरवल्यावर कुठे जावे, काय करावे? रायगडी जावे, की स्वत:च्या बळावर वेगळे राज्य उभे करावे असा विचार शंभुराजांच्या मनात आला नसेल तर नवलच.
आणि अचानक एक दिवस रायगडावरुन थैली आली, तब्बल पावणे दोन वर्षांनंतर शिवाजीराजांचे पत्र आले, कानात प्राण आणुन पत्र ऐकायला सुरुवात केली, “….. आमच्या भेटीसाठी आपण खुप ऊत्सुक असल्याचे कळते, मात्र यापुढे आम्हास आपले तोंड दाखवण्याची कोसिस करु नये. ………. आमच्या भेटीसाठी मोहरा न वळवता आपण लागल्या पावली सज्जनगडाकडे निघुन जावे. तिथे श्री. रामदास स्वामींच्या संगतीत रहावे, थोडे सदाचाराचे आणि सद्वर्तनाचे धडे गिरवावेत. वखत निघुन जाण्याआधी शहाणे व्हावे ….” ! म्हणजे शंभुराजांना चुक ठरवुन, त्यांना आपल्याला न भेटण्याचे सांगुन परस्पर रामदास स्वामींकडे जाण्याची आज्ञा दिली. का, काय चुकलं होतं त्यांचं? त्यांना परस्पर शिक्षाच का सुनावली?
अशा प्रसंगी दिलेरखानासारखा कट्टर शत्रुसुद्धा घनिष्ट मित्र वाटावा, अशी मनस्थिति झाली संभाजीराजांची. केवल वडिलांची आज्ञा म्हणुन इच्छा नसताना सुद्धा शंभुराजे सज्जनगडी दाखल झाले, तर काय गडावर स्वामीच नाहीत. त्रिलोकज्ञानी असणारे स्वामी, त्यांना संभाजीराजे येत असलेली खबर मिळाली नसेल? शिवाजीराजांनी स्वामींना कळवले नसेल? त्यांनी शंभुराजांना सज्जनगडावर पाठवण्याचा निर्णय स्वामींशी विचारविनिमय न करता परस्पर घेतला असेल? नाही, शक्यता कमीच वाटते, मग त्या वेळेला गडावर रामदास स्वामी का नव्हते? संभाजीराजे गडावर तब्बल दीड महिना होते, तो पर्यंत स्वामी गडावर का बरं आले नसावेत? आणि अशा विमनस्क अवस्थेत दिलेरखानानी दिलेली आश्वासने, त्याची मधाळ पत्रे, त्यानी पुढे केलेला मैत्रीचा हात या सगळ्या गोष्टींकडे जर शंभुराजे खेचले गेले तर फक्त त्यांनाच दोष द्यायचा? जर शिवाजीराजे त्यांना एकदा फक्त एकदाच भेटले असते, तर शंभुराजांवर दिलेरखानाला जाऊन मिळालेला युवराज असा कलंक लागलाही नसता, पण शेवटी नशिब आणि नियती, यांच्या पुढे अजुनही कोणाचं चालत नाही.
बरं, दिलेरखानाला जाऊन मिळाल्यावर तरी त्यांना शांतता मिळाली का? भुपाळगडाच्या स्वारीत मावळ्यांना निष्कारण दिलेली शिक्षा, आठशे मावळ्यांचे हात – पाय तोडण्यात आले तेव्हा शंभुराजे काय करु शकले? विजापुरवर केल्या गेलेल्या स्वारीत अनेक माया-बहिणींची उघद्यावर अब्रु लुटली गेली. “युवराज, वाचवा, वाचवा, आम्हाला वाचावा हो” म्हणत कित्येंकींचे प्राण गेले, किती तरी स्त्रीयांनी आपली अब्रु वाचवण्यासाठी विहीरींचा आधार घेतला, क्लेश, मनस्ताप, उपहास, अवहेलना, अपमान या शिवाय संभाजीराजांना काहीच मिळाले नाही. त्यांचे मतपरिवर्तन व्हावे म्हणुन युवराज्ञि आणि शिवाजीराजे धडपडत होते, पण दिलेरखानाच्या पहाऱ्यातुन एकाचाही खलिता शंभुराजांपर्यंत पोहोचु शकत नव्हता. दोघांचेही हेर शंभुराजांपर्यंत पोहोचण्याची पराकाष्ठा करत होते. शेवटी जेव्हा औरंगजेबानी दिलेरखानाला हुकुम दिला की संभाजीला कैद करुन दिल्ली येथे इतमामाने पाठवावे, त्याच वेळेला संभाजीराजांना सावध करण्यासाठी पाठवलेले हेर शंभुराजांपर्यंत पोहोचु शकले. या वेळेस मात्र संभाजिराजांना नशिबाने साथ झालेली दिसते, कारण त्या क्रुरकर्मा दिलेरखानाच्या तावडीतुन शंभुराजे सहीसलामत बचावले आणि शिवरायांच्या आज्ञेप्रमाणे पन्हाळगडी दाखल झाले.
तब्बल तीन वर्षांनी पितापुत्राची भेट होणार होती, त्या कालावधीत थोरले छत्रपति आणि संभाजीराजे यांनी नशिबाचे चांगले / वाईट बरेच अनुभव घेतले होते, कडु / गोड प्रसंगांच्या बऱ्याच आठवणी होत्या. या तीन वर्षाच्या कालावधीत शिवरायांनी ते कर्नाटक स्वारीवर गेल्यापासुन काय काय झाले असावे याची बित्तंबातमी काढली असावी, त्यात संभाजीराजांची एकट्याचीच चुक नाही आहे हे समजायला त्या ’जाणत्या राजाला’ कितीसा वेळ लागणार होता? आणि म्हणुनच आपले लेकरु आपल्याला येऊन मिळावे म्हणुन त्यांनी शक्य ते प्रयत्न केले असावेत. हा तोच पन्हाळगड ज्यांनी महाराजांना सिद्दी जौहरच्या राक्षसी पंजापासून लपवुन जवळ जवळ ९ महिने आपल्या उदरात सुरक्षित ठेवले होते, तोच पन्हाळा आज राजे – बाळराजांच्या भेटीच्या दृश्याने पावन झाला. त्या मंगलक्षणी राजे- बाळराजेंच्या मधली कटुता, वैचारीक भेदभाव नाहीसे होऊन त्यांच्या नजरेतुन फक्त प्रेमच वहात असावे. बावरलेल्या, घाबरलेल्या, हिंस्त्र श्वापदांच्या तावडीतुन परतुन आलेल्या आपल्या लेकराची मनस्थिती पुर्वपदावर यावी या करता राजांचा मुक्काम १० – १२ दिवस तरी पन्हाळ्यावर असावा.
त्यावेळेला राजे – बाळराजांचे मन आनंदाने भरुन वहात असताना, एकमेकांची ही भेट शेवटची भेट असेल असा विचार तरी दोघांच्या मनात डोकावुन गेला असेल का? संभाजीराजांनी पुढील आज्ञा होईपर्यंत पन्हाळगडावर राहावे असे सांगुन अत्यंत तृप्त मनाने शिवराय रायगडी परतले. त्यानंतर ३ एप्रिल १६८० रोजी झालेल्या राजारामाच्या व्रतबंध आणि लग्नाकार्याला रायगडाहून संभाजीराजांना मुद्दाम वगळण्यात आले, पुन्हा एकदा वरमाईचा वार जिव्हारी लागला आणि २१ एप्रिल १६८० साली संभाजीराजे सर्वार्थाने पोरके झाले. थोरले छत्रपति शिवाजीराजे भोसले यांचे महानिर्वाण झाले. अखिल महाराष्ट्रदेश पोरका झाला. घराघरातील मावळा पोरका झाला.
आपल्या मृत्युपश्चात गादीवर कोणी बसावे हा निर्णय शिवरायांनी घेतला नव्हता, सिंहासनाच्या लालसेपायी शिवरायांच्या मृत्युची बातमी दडवुन ठेवून अण्णाजी दत्तो, मोरोपंत यांनी एकीकडे शंभुराजांना पकडण्याचा कट करुन, दुसरीकडे राजारामचे मंचकारोहण करवून घेतले. आपल्या पित्याचे शेवटचे दर्शन घेण्याचेही भाग्यही शंभुराजांना लाभले नाही. तरीही “संभाजीने आपली सावत्र आई सोयराबाई हिस भिंतीत चिणुन मारले, तसेच अण्णाजी दत्तो वगैरे मंत्रांना ठार केले” असे खोटे आरोप त्यांच्यावर लावले गेले. त्याचप्रमाणे संभाजी हा रागीट, उग्रप्रक्रृती, दारु पिणारा, स्त्रियांशी अनैतिक वर्तन करणारा असे विविध आरोपही त्यांच्यावर चिकटवण्यास सुरुवात झाली.
शंभुराजांच्या अंगी विलक्षण शौर्य आणी बेडरपणा होता, हे जरी सर्वाना मान्य असले, तरी त्यांच्याजवळ दुरदृष्टि नव्हती, व्यसनाधीनतेमुळे त्यांच्या गुणाचे चीज झाले नाही; त्यांच्या जवळ विवेक आणि विचार यांचा अभाव होता असाही लोकांचा समज आहे.
रागाच्या आवेशात त्यांनी क्रुरपणे कोणालाच मारलेले नाही. ज्यांनी शंभुराजांना पन्हाळ्यावर पकडुन कैदेत टाकायचा कट रचला होता, त्या अण्णाजी दत्तो, मोरोपंत सोयराबाई वगैरे लोकांबरोबरही ते सामपोचाराने वागलेले दिसतात. कटवाल्यांना त्यांनी कैदेत टाकले. मोरोपंत कैदेत असतानाच नैसर्गिक मृत्युने मरण पावले. सोयराबाईंना भिंतीत चिणुन मारले, हा आरोपही खोटाच आहे. सोयराबाईंचा संभाजीराजांना पकडण्याच्या कटात हातच नव्हे तर इतर मंत्रांबरोबरीचा संबंध असला, तरी रायगडावर येताच शंभुराजांनी त्यांना मारलेले नाही. पुढे वर्षा-सव्वावर्षानंतर शहजादा अकबरामुळे शंभुराजांना ठार मारण्याचा दुसरा कट उघडकीस आला; त्यानंतर सोयराबाईंनी स्वत: विषप्राशन करुन आत्महत्या केली असावी. मराठ्यांच्या छत्रपतिंनाच मारायचा कट उघडकीस आल्यावर मात्र कटात हात असलेल्या लोकांना शंभुराजांनी ठार केले. राजद्रोहाला यापेक्षा दुसरे शासन होऊ शकतच नाही.
जबरदस्त स्त्री-विषयक आसक्तिचे आणि मद्यपानाचे संभाजीराजांवर आरोप करण्यात येतात. या दोन्ही व्यसनांच्या आहारी गेलेला माणुस स्वत:च्याच नव्हे तर सर्व कुटुंबाचा नाश करतो, अशा व्यसनाधीन माणसाच्या हातात राज्य सुरक्षित राहील काय? जवळ जवळ सर्व बखरी आणि काही तत्कालीन लेखक राजांवर हा आरोप करतात, पण तत्कालीन पोर्तुगिज पत्रव्यवहार, अखबार आणि मराठी पत्रव्यवहारात यासंबंधी साधा उल्लेखही आढळत नाही.
शंभुराजांना भेटण्यासाठी डिसेंबर १६८२ मध्ये इंग्रज अधिकारी स्मिथ, १६८४ साली इंग्रज वकील कॅ. गॅरी, थॉमस विल्किन्स, १६८७ साली सप्टेंबर महिन्यात जॉर्ज वेल्डन, रॉबर्ट ग्रॅहॅम हे वकील रायगडला आले होते. तहाच्या वाटाघाटींसाठी त्यांचा अनेक दिवस तेथे मुक्काम होता. १६८० साली डच वकील रेसिडेंट लेफेबेर राजांना भेटण्यासाठी पन्हाळ्याला आला होता. १६८५ मध्ये पोर्तुगिज वकिलात राजांना रायगडावर भेटली होती; या परकीयांपैकी कोणीही राजांच्या व्यसनाधीनतेबद्दल आपल्या प्रमुखांना कळवलेले नाही. शत्रुपक्षाकडील उणीदुणी टिपुन त्यांची नोंद करुन, जमेल तर त्या दोषांपासून लाभ उठवण्यात वकिलातीचे लोकं तत्पर असतात., हे ध्यानी ठेवले तर शंभुराजांवर घेण्यात येणारा व्यसनाधीनतेचा आरोप खोटा ठरतो.
संभाजीराजांनी राज्यव्यवहार करण्यास सुरुवात केल्यानंतर थोडे स्थिरस्थावर होते न होते तोच शहजादा अकबर त्यांच्या आश्रयासाठी आला, त्याला आश्रय द्यावा की नाही या विचारांत असतानाच तो प्रत्यक्ष मराठी राज्यात येउन पोहोचलाही. उत्तरेतील सत्ताधिशांपैकी कोणी पाठींबा दिला तर संभाजीराजांच्या सहाय्याने उत्तरेत औरंगजेबाविरुद्ध उठाव करावा अशी अकबराची कल्पना होती. मराठ्यांनी आश्रय दिल्यामुळे औरंगजेब दक्षिणेत थोडा लवकर उतरला, तरी त्याचे संकट शंभुराजांनी ओढवुन घेतले हे मात्र चुकीचे आहे. राजांनी अकबराला आश्रय दिला नसता तर हे संकट टळले असते असे नव्हे. राजांनी औरंगजेबाची पर्वा न करता त्याच्या मुलाशी अत्यंत काळजीपुर्वक वर्तन ठेवले, त्याला राजकारणात कुठेही ढवळाढवळ करु दिली नाही, यावरुन त्यांचे धोरण सुसंगत, धाडसी असुन ते स्वत: अत्यंत जागरुक होते हे समजते.
संभाजीराजांची एकुण कारकिर्द नऊ वर्षांची ! त्यात पोर्तुगिजांशी लढा देउन तरूण वयात त्यांना चांगली अद्दल घडवली, अनेक विजय संपादन केले, सिद्दीलाही सडेतोड उत्तर दिले, आणि आता स्वत: औरंगजेबच मराठी राज्याचा नायनाट करायला आला होता. त्याला उत्तरेत कोणी शत्रु राहीलाच नव्हता. दक्षिणेकडील विजापुर, गोवळकॊंडा आणि मराठे यांचा नायनाट करण्याची आपली दीर्घकाळाची महत्वाकांक्षा पुर्ण करण्याच्या हेतुनेच तो दक्षिणेत उतरला होता. त्याचा सेनासंभार मराठ्यांच्या सामर्थ्यापेक्षा किती तरी पटींनी अधिक समृद्ध आणि संपन्न होता. तरीही संभाजीराजांच्या सेनेनी त्याच्या सेनेला इतके सळो कि पळो करुन सोडले होते की औरंगजेबाला आपल्या अधिकाऱ्यांच्या सतत बदल्या कराव्या लागत होत्या. मुघलांचे अवाढव्य सैन्य आणि त्यांचा बादशाही सरंजाम कोठेही स्थीर होऊ दिला नाही. माणसे, घोडे, मालवाहू जनावरे, धान्य यांचा मराठ्यांनी गनिमीकाव्याने नाश केला.
कल्याण, भिवंडी, रायगड, पुरंदर वगैरे सर्वच मराठी मुलखात औरंगजेबाला सतत तीन वर्षे दारुण अपयश आल्यामुळे त्याने आपला मोहरा विजापूर, गोवळकॊंड्याकडे वळवला. औरंगजेबाने आपल्या डोक्यावरचा किमॉंश फेकुन देऊन संभाजीचा पराभव केल्याशिवाय तो पुन्हा डोक्यावर घालणार नाही अशी प्रतिज्ञा केली होती.
या सर्व आघाड्यांवर तोंड देत असताना कधी गोवा तर कधी हबसाण, कधी कर्नाटक तर कधी राजापूर, सिंहगड, तर कधी चवताळलेल्या शुर सिंहासारखा गर्जत गंगातीरावर तुटुन पडणाऱ्या संभाजीमहाराजांना मदिरा आणि मदिराक्षींच्या नादात गुंतुन पडायला वेळ मिळणे शक्यच नव्हते. त्यांच्या झंझावाती कारकिर्दित त्यांना स्वत:च्या पत्नीसाठी, त्यांच्या प्राणप्रिय ‘सखी राज्ञि’साठी सुद्धा वेळ मिळाला असण्याची शक्यता जरा कमीच.
पोर्तुगीज आणि थोरले छत्रपति यांचे संबंध शेवटी ताणलेच गेले होते. संभाजीराजांनी पोर्तुगीजांशी प्रथम मवाळ धोरण ठेवले. मराठ्यांचे सैन्य पळपुटे आहे अशी पोर्तुगीजांची समजुत होती. शंभुराजांनी त्यांना जबरदस्त तडाखा दिला, त्यांचे अस्तित्व धोक्यात आणले असे स्वत: पोर्तुगीजांनीच म्हटले आहे.
१६७८ मध्ये रागावून आणि गृहकलहाला कंटाळून स्वत:च्या कर्तुत्वावर राज्य मिळवण्याच्या ईर्षेनी संभाजीराजे दिलेरखानाला जाऊन मिळाले, त्यांचे पुर्वज, उदा. मालोजीराजे, शहाजीराजे आणि स्वत: छत्रपति शिवाजीमहाराज काही काळ परकीय सत्तेचे जहागिरदार होते; परंतु संभाजीराजे एका स्वतंत्र राज्याचे युवराज होते, त्या दृष्टीने विचार करता, अभिषिक्त युवराजाने शत्रुला जाऊन मिळणे हे नि:संशय चूक वाटते. परंतु दिलेरखानाने हिंदुंवर केलेले अत्याचार, अन्याय आणि गैरवर्तणुक सहन न होताच ते दिलेरखानाच्या हातावर तुरी देऊन निसटले हे ही लक्षात घेतले पाहिजे. तसेच अकबराला आश्रय देताना त्यांनी कवि कुलेश यांचा सल्ला घेतला हे खरे असले तरी ते कोणत्याही प्रकारे कविंच्या आहारी गेले नव्हते. कवि कुलेश मोघलांना फितुर होता किंवा त्याने राजांना पकडून दिल्याचे पुरावे उपलब्ध नाहीत. अखेरच्या श्वासापर्यंत त्याने मराठी राज्याशी, मराठी राजाशी सचोटीने आणि एकनिष्ठपणे राहून अखेरीस छत्रपतिंबरोबर देहदंड ही सोसलेला आहे.
संभाजीराजांनी शिवरायांप्रमाणेच शत्रुच्या प्रदेशातील व्यापारी पेठा लुटल्या, त्यांनी औरंगाबाद आणि बुऱ्हाणपुर येथे केलेल्या लुटी इतक्या परिपुर्ण होत्या की त्यामुळे तेथील मुसलमानांना ‘शुक्रवारचा नमाज पढायला जागा उरली नव्हती. बुऱ्हाणपुर शहर हे विश्वरुपी सुंदरीच्या गालावरील तीळ समजला जात असे, मराठ्यांनी ते शहर लुटले तेव्हा ते पाऱ्यासारखे अस्थिर झाले होते’ असे खुद्द अकबराने औरंगजेबाला पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.
बखरी आणि तत्कालीन फार्सी लेखक जरी संभाजीराजांना दुषणे देत असले तरी त्याच वेळी संभाजीमहाराजांच्या व्यक्तिमत्वाबद्दल, शौर्याबद्दल, युद्घकौशल्याबद्दल ‘पित्याचे शौर्य आणि स्थान यांचा वारसा संभाजीकडे आला आहे’ आणि ‘… तो तरुण राजपुत्र धैर्यवान, आपल्या पित्याच्या कीर्तीला शोभेल असाच आहे, …. त्याचे सैनिक त्याला जणु शिवाजी समजुनच मान देतात, त्यांना संभाजीच्या हाताखाली लढायला आवडते, … शुर कृत्यांच्या सन्मान करण्यास संभाजीराजे सदैव तत्पर असतात’ इ. इंग्रजांच्या आणि इतर प्रवाशांच्या उद्गारांकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही.
औरंगजेब दक्षिणेत ठाण मांडून बसलेला असतानाही शंभुराजांनी न डगमगता वऱ्हाड, खानदेश, औरंगाबाद, सोलापूर, परिंडा, बुऱ्हाणपुर, आणि अहमदनगर येथे मुघल प्रदेशात आक्रमक हल्ले केले; लुटमार केली.
संभाजीमहाराजांनी मरण पत्करतांनाही जो बाणेदारपणा आणि जे शौर्य दाखवले ते असामान्य, अद्वितियच आहे. शंभुराजांचा युद्घात पराभव करणे जवळजवळ अशक्य आहे असे लक्षात येताच औरंगजेबाने त्यांना पकडण्याचे डावपेच टाकायला सुरुवात केली; परंतु दैवाचे फासे उलटे पडले आणि राजेच औरंगजेबाच्या हाती लागले. ते शेवटी नावाडी नावाच्या खेड्यात पकडले गेले ते परिस्थितीमुळे, औरंगजेबाच्या डोळस बातमीदारांमुळे आणि गणोजीराजे शिर्के यांच्या फितुरीमुळे. संभाजीराजांनी तेथे ही पराक्रम केला, लढाई केली पण त्यांच्या दुर्दैवी जीवनाची अखेर करणारा सर्वात दुर्दैवी प्रसंग काही चुकला नाही.
औरंगजेबाने संभाजीराजांसारखा मातब्बर आणि जशास तसे या बाण्याने वागणाऱ्या शत्रुला जीवदान देण्याची सुतराम शक्यता नव्हती। त्यांच्यासारखा शुर राजा नाहीसा केला म्हणजे मराठी साम्राज्य सहज गिळंकृत करता येईल अशी औरंगजेबाची समजुत होती. खरं तर जिवावर बेतल्यावर माणसे कशी स्वाभिमानशुन्य होतात याची उदाहरणे बरीच आहेत, संभाजीराजांनी मात्र स्वत:ला हा काळिमा लावून घेतला नाही. ते शत्रुला शरण गेलेच नाहीत, पण त्याच्यापुढे स्वत:ची मान ही तुकवली नाही.
महाराज पकडले गेले त्याच दिवशीच त्यांनी आपल्या नश्वर देहावर उदक सोडले. याच औरंगजेबाच्या हातावर तुरी देउन शिवराय आणि बाळराजे आग्र्याहून निसटले होते. त्याच मुक्कामात बालसंभाजीने मल्लयुद्घ खेळण्यास नकार देऊन आपला बाणेदारपणा दाखवला होता. दिलेरखानाकडे असतनाही युवराज संभाजीला पकडण्याचा घाट औरंगजेबाने घातला होता, तेव्हाही जागरुक होऊन संभाजीराजे मुघलांकडुन पळाले होते. औरंगजेब अशा शुर आणि कर्तुत्ववान राजाचा इतिहास विसरणे शक्यच नव्हते, म्हणुनच सावज हातात लागताच त्याने शंभुराजांचे डोळे काढले. डोळे गेले तरी संभाजीराजे बिचकले नाहीत, आणि तशीच बादशहाची सुडबुद्धीही थंडावली नाही. प्रत्यक्ष मृत्यु येई पर्यंत तो शंभुराजांचे हाल हाल करतच होता; परंतु या दृढनिश्चयी राजाला त्याची खसखस सुद्धा पर्वा नव्हती. त्यांनी कर्तव्य करताना, राजद्रोह्यांना शिक्षा देताना अशीच कर्तव्यकठोर बुद्धी ठेवली होती. जन्मभर सर्व बाजुंनी वेढणाऱ्या शत्रुंशी लढा दिला होता. आपल्या प्रजेला दिलासा देणारा, मार्दव आणि कळकळ दाखवणारा हा राजा तितकाच कठोर आणि द्रुढनिश्चयीही होता.
छत्रपति संभाजीराजांच्या देहाचे अनिन्वित हाल हाल करताना, त्यांना शक्य तितक्या यातना देऊन आपली थोरवी गाणाऱ्या त्या दिल्लीपतीला महाराष्टातल्या देवबोलीतील पुढील ओव्या आठवण्याचे काहीच कारण नव्हते.
“नैनं छिंदंती शस्त्राणी, नैनं दहती पावक :।
न चैनं क्लेदयंत्यापो, न शोषयती मारुत: ॥
संभाजीराजांचा देह औरंगजेबाच्या पाशवी वृत्तीला बळी पडला, पण त्याच बलिदानातून आणि हौतात्म्यातून मराठी राज्य बचावले हे मराठी मनाच्या बांधवांना कधीच विसरता येणार नाही.
हे अचाट कृत्य केवळ शिवाजीराजांसारख्या सिंहाला शोभेल असेच त्यांच्या छाव्याने करुन दाखवले.
या महाराष्ट्र भुमीच्या सुपुत्राला मानवंदना देताना उर अभिमानाने भरुन येतो, डोळे पाणावतात, मान आपसुकच खाली झुकते.
Aanna Saheb me aaplya hya blog mule far bharavlo aahe.. aani aapna kadun aankhi shurteche samrat Chatrapati Shivaji Maharaj aani Uvraj Sambhaji Maharaj yanche balkadu pyavyas milel yachi aasha balgto....
ReplyDeleteapla subhchintak;
Kiran Somnath Ghuge.
kiranghuge@hotmail.com
Shriyut Annasaheb Chaudhari, ha blog mazha mhanaje Medha Kanitkar yancha aahe, tumhi chhakka chorala aahe ha blog, swatahala jar chhatrapati shambhuji bhakta mhanavata tar he asale udyog ka karata, tyanchya sarakhi dhadadi nahi tumchyat mhanun he choriche dhande.
ReplyDelete!!!!!!!!Raje Tumala Aadrane Pranam !!!!!!!!!
ReplyDelete!!!!!Raje Is Great Man In Maharashtra!!!!!!